Sunday, November 17, 2013

माझी नीस ट्रीप

कंपनीच्या कामानिमित्ताने फ्रान्समधील नीस येथे १० दिवस रहाण्याचा योग आला. झाले असे, की मी ज्या कंपनीत काम करतो त्यांचा दरवर्षी होणारा "युजर ग्रुप" ह्यावर्षी नीस येथे आयोजित करण्यात आला होता. तेथे आधीचे चार दिवस सगळा मांड मांडण्यासाठी, चार दिवस ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व नंतर कार्यक्रमाचे सूप वाजवून परत निघण्यासाठी असे १० दिवस ठरले होते.

विमानाचे तिकीट काढून प्रवासाला निघालो. हा काही माझा युरोपचा पहिला प्रवास नव्हता व फ्रान्समध्ये पूर्वी दोन वेळा जाऊन आल्यामुळे विशेष उत्कंठाही नव्हती. पण नीस पहिल्यांदाच पहाणार होतो. भूमध्य समुद्राच्या काठावर असलेले, मोनॅकोच्या शेजारी वसलेले आणि मोन्त कार्लोशी सलगी करणारे पर्यटनाचे ठिकाण म्हणून काही अपेक्षा बाळगून होतो.

पॅरिसच्या चार्ल्स द गॉल विमानतळावर आंतरराष्ट्रीय टर्मिनलवरून अंतर्देशीय टर्मिनलला विमान बदलण्यासाठी जायचे होते. छान मॉर्निंग वॉक झाला. चालून चालून कंटाळलो. मग एका बसमध्ये बसून इच्छित स्थळी पोहोचलो. पासपोर्टवर शिक्का वगैरे सोपस्कार झाले आणि दुसऱ्या विमानाची वाट पहात बसलो होतो. आपल्या रेल्वे स्टेशनसारखे साधारण दृश्य होते. फक्त फलाटावर असते तशी घाण नव्हती.

नीसला पोहोचलो. सामान ताब्यात घेऊन टॅक्सीमध्ये बसलो. जाण्याचे ठिकाण ड्रायव्हरला सांगितल्यावर गडबड न करता व्यवस्थित योग्य स्थळी पोचलो. मीटरनुसार पैसे घेऊन पावती त्याने न मागता हातात दिली. आजपर्यंत युरोपातसुद्धा मला पावती मागायला लागली होती. खळखळ न करता मिळायचीदेखील पण न मागता मिळाली हे विशेष.

पहिला दिवस, रोजची संध्याकाळ व शेवटचा अर्धा दिवस हे मला फिरण्यासाठी मिळणार होते. थोडा स्थिरस्थावर झाल्यावर थोडे हिंडावे म्हणून बाहेर पडलो. ट्रामच्या स्टॉपवर यंत्रात क्रेडीट कार्ड टाकून ७ दिवसांचा अमर्यादित प्रवासाचा पास काढून नीस पहायला सुरुवात केली. थोडी माहिती व नकाशा घेतला होता. त्यानुसार काय पाहायचे हे साधारण ठरलेले होते.

नीसमध्ये पहाण्यासारख्या थोड्याच गोष्टी आहेत. लांबलचक समुद्रकिनारा, थोडी वस्तुसंग्रहालये, डोंगर, सूर्यप्रकाश. वस्तुसंग्रहालये मी सहसा पहात नाही. बऱ्याच ठिकाणची पाहून झाल्यावर मी हा निर्णय घेतला आहे. तिथे त्यांनी काय ठेवले आहे हे त्यांचे त्यांना माहित आपण उगीच "अच्छा, बर,बर, अरे वा! हेच ते होय" असे काहीबाही म्हणत वेळ घालवायचा, पाय दुखवायचे आणि त्यांचे खिसे भरून थोडे फोटो काढून बाहेर पडायचे ह्यात मला आता गम्मत वाटत नाही.

मोनॅको व मोंट कार्लो ह्या ठिकाणी जाऊन कोणी सेलेब्रिटी दिसतात का हे पहाणे व फॉर्म्युला-१ च्या टर्ॅकवर फिरणे हे माझ्या आनंदाच्या व्याख्येत बसत नाही. तसेच तेथील कॅसिनोही मला खुणावत नाहीत. मग तिथे जाऊन मी बापडा काय करणार?

फ्रेंच रीव्हीएराचे बरेच कौतुक ऐकले होते म्हणून तो पहिल्यांदा पहायला गेलो. मोकळे आकाश, नजर जाईल तिथपर्यंत पाणी, आपण उभे असलेला समुद्रकिनारा - इथला किनारा वाळूचा नाही. म्हणजे ठेवलेला नाही. त्यावर दगड घालून पक्का केलेला / बांधून काढलेला आहे (pebbled). त्यावर चालायचे म्हणजे पायात काहीतरी हवेच. मुंबईची चौपाटी काहीवेळा तर इतर जवळपासचे किनारे सारखेच पहात असल्याने, ५-१० मिनिटांनी कंटाळलो. हा रिव्हिएरा एवढा का नावाजतात हे काही कळेना. नंतर लक्षात आले की मी नोव्हेंबरमध्ये आलो आहे. उन्हाळ्यात आलो तर किनारा व पाण्यापेक्षा किनाऱ्यावर सूर्यस्नान करणाऱ्या युवतींसाठी लोक इथे गर्दी करत असणार. हिवाळ्यात कोण येणार हो तिथे? असो.

नीस ह्या गावाचे आकर्षण हे उत्तर फ्रान्स व मध्य युरोपच्या लोकांना जास्त कारण त्यांना सूर्यप्रकाश, समुद्र, सूर्यस्नान ह्यांचे फारच अप्रूप. मी वर्षातले ११ महिने समुद्रकिनारा पहातो (१ महिना पुण्यात असतो), ११|| महिने सूर्यप्रकाश पहातो (साधारण १५ दिवस ढगाळ असतात किंवा पाऊस पडतो). मला त्यातील कोणत्याच गोष्टीचे नवल नाही. पुलंच्या अंतू बर्वाची आठवण झाली. "त्याच्या पंच्याला विचारतो कोण?"

एकूण सांगायचे तर इतर कोणत्याही युरोपीय गावासारखेच नीस हे एक गाव आहे. गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. पण त्याचबरोबर, भरपूर पर्यटक येणार ह्याची खात्रीपण आहे. त्यामुळे पर्यटकांशी व्यवस्थित वागले पाहिजे ह्याची अजिबात फिकीर नाही.

काही अपवादही भेटले. Caspienne नावाच्या एका ईराणी रेस्टॉरंटमध्ये छान जेवण मिळाले. चालविणारे नवराबायको चांगले होते. गप्पा मारतामारता त्यांच्या मुलाविषयी कळले. २१ वर्षांचा मुलगा ४ वर्षांपूर्वी अपघातात गेला. सोबत त्याचे दोन मित्रपण देवाघरी गेले. त्या बाईच्या डोळ्यात पाहिलेली वेदना मी कधीच विसरू शकणार नाही.

गावात Promenade केलेले आहे. तेथे कारंजी आहेत. लोकांना कला दाखविण्याची व त्यावर पैसे मिळविण्याची सोय आहे. भिकारी आहेत. तुम्हाला थोडेसे अंतर हिंडवून आणणाऱ्या सायकल रिक्षा आहेत. महागड्या वस्तू विकणारी पॉश दुकाने आहेत आणि बनावट माल विकणारे फुटपाथवरचे विक्रेतेसुद्धा आहेत.

शहराचा फेरफटका मारण्यासाठी ट्राम, बस, टॅक्सी आहेत. बस व ट्राम एकाच तिकिटावर वापरता येतात. सायकल भाड्याने घेऊन फेरफटका मारण्याची उत्तम सोय आहे पण हे बरेच महाग आहे. त्यापेक्षा ट्राम व बस हा प्रवास उत्तम.

शेवटी, मुद्दाम जाऊन पहावे असे नीसमध्ये मला तरी काही आढळले नाही. यदृच्छया झाली तुमची भेट तर ठीक नाही तर "नीस नही देखा तो क्या देखा?" असे अजिबात नाही. ह्यापेक्षा पॅरिस, अॅमस्टरडॅम, ब्रुसेल्स वगैरे शहरे खूपच चांगली आहेत. हा, एक मात्र आहे, तुम्हाला नीसमध्ये खजूर दिसेल. तो खायला कसा असेल हे मात्र माहित नाही कारण मी ट्राय नाही केला. पण अरबस्तानात व इराणात पिकणाऱ्या खजुराच्या तुलनेत त्याला काहीच किंमत नसणार कारण जगाच्या कोणत्याही बाजारात अगदी नीसमध्येसुद्धा मी "फ्रेंच खजूर" काही पाहिला नाही.

-- इति लेखनसीमा --